यवतमाळ : घाटंजी शहरातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमची तोडफोड करून त्यातील रोकड लंपास करण्याचा प्रयत्न एका सराईत गुन्हेगाराने केला. मात्र, त्यात तो यशस्वी झाला नाही. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला काही वेळातच ताब्यात घेतल्याने मोठी घटना टळली. या घटनेत एटीएमचे नुकसान झाले असले तरी त्यातील रक्कम चोरीस गेली नसल्याची माहिती आहे.
शुक्रवारी रात्री दोन वाजेदरम्यान सहाय्यक फौजदार राहुल खंडागळे, पोलिस अंमलदार दत्ता कुसराम आणि सचिन नेताम हे अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. अशात त्यांना सीआरओ यवतमाळ येथून माहिती मिळाली की, घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये संशयास्पद हालचाली सुरू असून, एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे एटीएमची तोडफोड झाल्याचे दिसून आले.
याबाबत पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार परिसरातील इतर एटीएम आणि आसपासच्या भागाची तपासणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र बँकेच्या एटीएमपासून काही अंतरावर असलेल्या एचडीएफसीच्या एटीएमलगतच्या गल्लीत ट्रॅक्टरच्या मागे एक संशयित व्यक्ती अंधारात लपून बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो विजय तानबाजी मडावी (वय 30, रा. राजूरवाडी, घाटंजी) असल्याचे निष्पन्न झाले.
तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एटीएमची तोडफोड करण्यासाठी वापरता येतील, अशी काही साधने जप्त केली. त्यानंतर एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता संबंधित आरोपी एटीएमची तोडफोड करताना स्पष्टपणे दिसून आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घाटंजी पोलिसांचे कौतुक केले. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस निरीक्षक केशव ठाकरे, सहाय्यक फौजदार राहुल खंडागळे, दत्ता कुसराम आणि सचिन नेताम यांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस दिले.