यवतमाळ : बारावीतील विद्यार्थिनीने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आर्णी येथे १६ जानेवारी रोजी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुलीच्या आत्महत्येस चार शिक्षक व एक तरुण जबाबदार असल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी पाचही जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. शेख फारूक शेख जब्बर (रा. मोमीनपुरा रा.आर्णी) असे तरुणाचे, तर शिंदे, परगने, मुंडे, वानखडे अशी गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. अल्पवयीन विद्यार्थिनी आर्णी येथे भाड्याची खोली करून देवराव पाटील विद्यालयात शिकत होती.
विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणाला एका आठवड्यानंतर नवे वळण मिळाले आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख फारुख शेख जब्बर हा मुलीला सतत फोन करून लग्न करण्यासाठी तगादा लावत त्रास देत होता. त्याचवेळी वर्गातील एका विद्यार्थिनीचा मोबाइल हरवल्यानंतर शिक्षकांनी मुलीवर संशय घेतला.
मुलगी मकर संक्रांतीनिमित्त १३ जानेवारी रोजी गावी आल्यानंतर तिने मोबाइल चोरीच्या प्रकाराची माहिती दिली होती. विशेष म्हणजे सदर मोबाइल तीन दिवसानंतर शाळेच्या महिला प्रसाधनगृहात सापडला होता. परंतु, तरुणाकडून लग्नासाठी होणारा तगादा आणि शिक्षकांनी घेतलेल्या चोरीच्या आळामुळे मुलगी तणावात होती. पुढील तपास ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दुर्योधन राठोड करीत आहेत.