यवतमाळ : प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी सासरा आणि मेहुण्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतसिंह मर्दानसिंह जाधव, रवी भारतसिंह जाधव दोघेही (रा. फुलसावंगी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.
अनुज जाधव (रा. उत्तर प्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. अनुज आणि पिंकी देवी यांनी आठ जानेवारी २०१८ ला प्रेमविवाह केला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयात 'कोर्ट मॅरेज' रजीस्टर केले होते. आंतरराज्यीय विवाहाला पिंकीचे वडील भारतसिंह जाधव आणि भाऊ रवी जाधव यांचा तीव्र विरोध होता. लग्नानंतर दोघेही अनुज व त्याच्या कुटुंबाला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
अशात मंगळवारी (ता. सहा) रात्रीच्या सुमारास अनुज जाधव याची हत्या करण्यात आली होती. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह फुलसावंगी येथील घरात पडून होता. अनुजच्या डोक्याच्या मागील भागावर जखमा आढळून आल्या. तर हत्येचा संशय येऊ नये म्हणून तोंडात मंजन लावून आत्महत्येचा बनाव करण्यात आला होता. सुरवातीला महागाव पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. मात्र, अनुजने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी तक्रारीतून केला होता. या प्रकरणी मृताचा भाऊ नेकपालसिंह भुरासिंह जाधव यांनी गुरुवारी (ता. २२) महागाव पोलिस ठाणे गाठून मृताचा सासरा भारतसिंह जाधव आणि मेहुणा रवी जाधव याच्याविरोधात तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल राठोड यांनी करीत आहे.
व्यवसायाचे आमिष दाखवून बोलावले
जिवाच्या भीतीमुळे अनुज हा मूळ गावी न राहता मध्य प्रदेशा-तील सारंगपूर येथे वास्तव्यास होता. दरम्यान, व्यवसायाचे आमिष दाखवून पिंकीच्या नातेवाइकांनी अनुज त्याची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांना फुलसावंगी येथे बोलावून घेतले होते. जून २०२५ मध्ये अनुज कुटुंबीयांसह फुलसावंगी येथे वास्तव्यास आला होता. त्यानंतर सासरा आणि मेहुण्याने त्याला जिवानिशी ठार मारले.