यवतमाळ : व्यापार्याला मारहाण करीत लुटमार करणार्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील सातही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून वडगाव जंगल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरोडेखोरांकडून तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे व्यापारी सैय्यद इजाज मुसा (रा. रुई) हे शुक्रवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून दोन कामगारांसह दिवसभरातील रोख घेऊन ते वाहनाने रुई वाई येथे जात होते. अशात चार अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला आणि बोरीसिंह शिवारात रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत त्यांच्यावर रॉडने हल्ला केला. तसेच डिक्कीतील रोख 55 हजार रुपये जबरीने हिसकावून पळ काढला.
जखमी व्यापारी यांचे कामगार सोहेल युसूफ कुरेशी यांच्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, वडगाव जंगल ठाणेदार असे मिळून पाच पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.
दरम्यान, संशयाच्या कारणातून शेख हुसेन शेख मेहबूब (वय 28, रा. रुई) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने सात साथीदारांच्या साहाय्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तर चोरी केलेली रक्कम साथीदार शुभम तुरे याच्याजवळ असून, इतर साथीदार पैसे घेऊन पळून गेल्याचे सांगितले. तद्नंतर तांत्रिकदृष्ट्या तपास करीत गुन्ह्यातील इतर आरोपींना दारव्हा येथून ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच वाहन असा एकूण तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींना वडगाव जंगल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शात ठाणेदार विकास दांडे, मनीष गावंडे, शिवशंकर कायंदे, सागर इंगळे, भाऊराव बोकडे, प्रशांत हेडाऊ, रूपेश पाली, रितुराज मेढवे, नीलेश राठोड, मिथून जाधव, कवीश पाळेकर, किशोर झेंडेकर, महेश वकाडे, सुनील पैठणे, प्रतीक नेवारे, देवेंद्र होले, अमीत कुमरे, गणेश आगे, धनंजय शेकदार, शिवाजी शिंदे, अनिल गिनगुले, अक्षय डोंगरे, सागर केराम, पुकार वाकोडे यांनी केली.