Crime News  Pudhari
यवतमाळ

Yavatmal Crime : दिग्रसमध्ये अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा; २०० किलो गोमांस जप्त, १४ गोवंशांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखान्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम राबवत रविवारी पहाटे धडक कारवाई केली. मोतीनगर परिसरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल २०० किलो गोमांस जप्त केले असून, कत्तलीसाठी निर्दयपणे डांबून ठेवलेल्या १४ गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पहाटेची गुप्त कारवाई आणि अटक

परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार डॉ. तेजस सारडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोतीनगर भागात तीन ठिकाणी छापे घातले. यावेळी मो. अस्लम शेख उस्ताद, शेख आवेश शेख रफीक आणि शेख अजहर शेख हुसेन यांनी लहान-मोठ्या १४ गोवंश जनावरांना अत्यंत अमानुषपणे एका ठिकाणी कोंडून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने या जनावरांना जीवदान देत त्यांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

रंगेहाथ पकडले आरोपी

मोतीनगरमधील कारवाईनंतर पोलिसांनी आपला मोर्चा आर्णी नाका परिसराकडे वळविला. तेथे मोहम्मद तौफीक अब्दुल खल्लीद आणि मोहम्मद वाजीद मोहम्मद अब्दुल गफ्फार हे दोघे गोमांसाचे तुकडे करून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत २०० किलो मांसासह मांस कापण्याचे सुरे, वजन काटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक महेश देशमुख, रामप्रभू सातपुते, जमादार मोर्लेवार, मोरेश्वर राठोड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT