(File Photo)
यवतमाळ

Yavatmal Crime : नामांकित सराफा दुकानावर दरोडा, ९७ लाखांचे दागिने लंपास

तोंडाला मास्क आणि अवघ्या २० मिनिटांत ९७ लाखांची थरारक लूट

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : एका नामांकित सराफा दुकानावर दरोडा टाकून अवघ्या २० मिनिटांत तब्बल ९७ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रकमेवर दरोडेखोरांनी हात साफ केला. आज बुधवारी पहाटे पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजेंद्र श्रीमल वर्मा (वय ६१) यांनी पांढरकवडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके गठित करून रवाना करण्यात आली आहेत.

असा उघडकीस आला प्रकार

राजेंद्र वर्मा हे मागील ५० वर्षांपासून त्यांच्या राहत्या घराला लागूनच 'राजेंद्र ज्वेलर्स' हे दुकान चालवतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी सात वाजता त्यांनी दुकान बंद केले होते. बुधवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मशिदीत प्रार्थनेसाठी जाणारे स्थानिक नागरिक अब्दुल राजवाणी यांना वर्मा यांच्या दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने वर्मा यांच्या घराच्या मागील दरवाजावर जाऊन त्यांना उठवले आणि दुकानाच्या दुरवस्थेबद्दल सांगितले.

राजेंद्र वर्मा यांनी तत्काळ दुकानात धाव घेतली असता, त्यांना शटरचे दोन्ही चॅनल लॉक तोडलेले आढळून आले. दुकानाच्या आतील तिजोऱ्या आणि ड्रॉव्हरमधील सामान अस्ताव्यस्त पडले होते.

अवघ्या २० मिनिटांत ९७ लाखांची लूट

चोरट्यांनी दुकानातून ४८ लाख ५० हजार रुपये किमतीचे अंदाजे ४१६ ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच तब्बल १८.५ किलो वजनाचे चांदीचे दागिने (किंमत ३७ लाख ५० हजार रुपये) आणि ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच वर्मा यांचा मुलगा अंशित वर्मा यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तोंडाला काळे व निळे मास्क लावलेले आणि हातमोजे घातलेले चार अनोळखी चोरटे पहाटे ४:०५ वाजता दुकानात शिरल्याचे स्पष्ट दिसले. अत्यंत सराईतपणे अवघ्या २० मिनिटांत, म्हणजेच पहाटे ४:२५ वाजेपर्यंत संपूर्ण दुकान लुटून चोरट्यांची ही टोळी दुचाकीवरून पसार झाली.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. पांढरकवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, पहाटे झालेल्या या मोठ्या दरोड्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT