यवतमाळ

Yavatmal Crime : फोटो काढण्याच्या बहाण्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आर्णी पोलिसांकडून दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : लग्नासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींना फोटो काढण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आर्णी तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी गुरुवारी (दि. २३) दोन नराधमांना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गणेश राठोड (वय २१) आणि नितीन ढाले (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २२) तालुक्यातील एका गावात पीडित मुलींच्या नातेवाईकांचा विवाह सोहळा होता. या लग्नासाठी आरोपी गणेश राठोड आणि नितीन ढाले हे दोघेही आले होते. लग्नातील जेवण आटोपल्यानंतर, या दोघांनी १४ आणि १७ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींना "तुमचे छान फोटो काढून देतो" असे आमिष दाखवले. या बहाण्याने त्यांनी दोन्ही मुलींना मोटारसायकलवर बसवून कोसदणी येथील जंगलात नेले. तिथे निर्जन स्थळाचा फायदा घेत दोघांनीही या मुलींवर जबरदस्तीने अत्याचार केला.

पोलिसांची तत्पर कारवाई

या भीषण प्रसंगानंतर पीडित मुलींनी गुरुवारी हिंमत एकवटून आर्णी पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला प्रसंग सांगितला. मुलींच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी गणेश राठोड आणि नितीन ढाले यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र देशमुख यांच्यासह शिवाजी शेळके, मंगेश जगताप आणि संदीप ढेंगे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT