यवतमाळ : मोबाईलवर आलेली एपीके (APK) फाइल इन्स्टॉल करताच बँक खात्यातून तब्बल दोन लाख रुपयांची रक्कम गायब झाल्याची घटना घाटंजी शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घाटंजी येथील संजय धांदे यांच्या मोबाईलवर एक एपीके फाइल आली होती. ही फाइल नेमकी कशासाठी आहे याची माहिती नसल्याने त्यांनी ती इन्स्टॉल केली. यानंतर हॅकरने यूपीआयच्या (UPI) माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सुमारे एक लाख रुपये खात्यातून परस्पर वर्ग करण्यात आले. ही बाब लक्षात येताच धांदे यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी त्यांना सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. मात्र, यानंतरही धांदे यांच्या खात्यातील अनधिकृत व्यवहार थांबले नाहीत. सोमवारी पुन्हा त्यांच्या बँक खात्यातून तीन व्यवहार होऊन सुमारे एक लाख रुपये परस्पर वर्ग करण्यात आले.
अशा प्रकारे दोन टप्प्यांत मिळून धांदे यांच्या खात्यातून सुमारे दोन लाख रुपये हॅकरने लंपास केले. यानंतर धांदे यांनी सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी संबंधित व्यवहारांची तातडीने माहिती घेऊन कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान सुमारे ४३ हजार रुपये परत मिळवण्यात यश आल्याचे धांदे यांनी सांगितले. उर्वरित रक्कम मिळण्याची प्रतीक्षा असून, या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.