यवतमाळ

Yavatmal Crime : बर्थडे पार्टीत रक्तरंजित थरार! मित्रावर चाकू हल्ला, इन्स्टाग्रामवर 'इमोजी' पाठवणे पडले महागात; १३ जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : सोशल मीडियावरील एका क्षुल्लक स्टेटसचे रूपांतर गंभीर हाणामारीत होऊन एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना ढाणकी येथे घडली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून धारदार चाकूने केलेल्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बिटरगाव पोलीस ठाण्यात तब्बल १३ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी हर्षद संतोष खटके (वय १८, रा. ढाणकी) हा संत गाडगे बाबा कॉलेजमध्ये ११ वीत शिकतो. सोमवार, ८ जून रोजी दुपारी आरोपी अमन पठाण याने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर हाताला सलाईन लावल्याचे एक स्टेटस ठेवले होते. त्यावर हर्षदने ‘स्माईल’ची इमोजी पाठविल्यामुळे दोघांमध्ये ऑनलाइन वाद झाला होता. दरम्यान, त्याच दिवशी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास हर्षद आणि त्याचे इतर मित्र ढाणकी येथील सहारा पार्क येथे गोलू गिरी या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते.

दुपारी झालेल्या याच वादाचा वचपा काढण्यासाठी मुख्य आरोपी धम्मदिप संजय काळबांडे याच्यासह दहा जण चार मोटारसायकलवरून सहारा पार्क येथे आले. त्यांनी हर्षदसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने धम्मदिपने फोन करून त्याच्या आणखी तीन मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून हर्षदने दुपारच्या प्रकरणावरून त्यांची माफीही मागितली; परंतु आरोपींनी काहीच ऐकले नाही. यावेळी आरोपी सूरज काळबांडे याने हर्षद व त्याच्या मित्राच्या कानशिलात लगावली.

हा वाद सोडवण्यासाठी गोलू गिरी मधे पडला असता, मुख्य आरोपी धम्मदिप काळबांडे याने कमरेचा चाकू उपसून ‘तुम्हाला एक-एक करून खतमच करतो’ अशी धमकी दिली आणि थेट गोलूच्या मानेवर चाकूने जीवघेणा वार केला. या हल्ल्यात गोलू गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी धावलेला मित्र ओमकार भुसावळे याच्या पाठीवरही आरोपी धम्मदिपने चाकूने वार केले. तसेच फिर्यादी हर्षद याच्या डाव्या बरगडीवर चाकू मारून त्यालाही जखमी केले.

त्याचवेळी रस्त्यावरून पोलिसांची गाडी येत असल्याचे दिसताच सर्व आरोपी पाच मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले. जखमी गोलू गिरी आणि ओमकार भुसावळे यांना तातडीने ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे हलविले आहे.

या घटनेनंतर हर्षद खटके याच्या तक्रारीवरून बिटरगाव पोलिसांनी मुख्य आरोपी धम्मदिप संजय काळबांडे, सूरज काळबांडे, मोहन काळबांडे, सुनील काळबांडे, मेधन काळ巴ंडे, सम्यक काळबांडे, अजय काळबांडे, अनिकेत काळबांडे, गोपाल रावते, अमन बुरेखान पठाण, रंजित वाढवे, पवन कांबळे आणि शेख असलम (सर्व रा. सावळेश्वर, मन्याळी व बिटरगाव) अशा १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT