(Pudhari File Photo)
यवतमाळ

Yavatmal Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेचा निर्घृण खून

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर येथील कोलामपोड परिसरात आज सोमवारी सकाळी रक्तरंजित घटनेने हादरला. पतीपासून वेगळे राहत असलेल्या एका 51 वर्षीय महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केला. कमलाबाई हुसेन मेश्राम असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

कमलाबाई मेश्राम या पती हुसेन गट्टू मेश्राम यांच्याशी कौटुंबिक वादामुळे काही दिवसांपासून वेगळ्या राहत होत्या. पती हुसेन हा पत्नीवर सतत संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. या त्रासाला कंटाळून कमलाबाई यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ‘कमलाबाई यांचा खून झाला असून त्या सदाशिव वाघधरे यांच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आहेत’ अशी माहिती नातेवाइकांना मिळाली.

घटनेची माहिती मिळताच मृत महिलेचे भाऊ चंद्रभान आत्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा कमलाबाई या अंगणात एका बाजूला पडलेल्या दिसल्या. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील रमेश कुंटलवार यांना देण्यात आली.

त्यांनी तत्काळ पांढरकवडा पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक तपासात हा प्रकार रविवारी मध्यरात्री एक ते सोमवारी सकाळी सहा वाजतादरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कमलाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेत पती हुसेन मेश्राम नेहमी भांडण करीत होता, अशी माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

त्यामुळे संशयातूनच हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT