यवतमाळ : शहरालगत असलेल्या धामणगाव मार्गावरील सूरजनगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत बेकायदेशीररीत्या सिलिंडरची साठवणूक करणाऱ्या टोळीचा यवतमाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बुधवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी ३० सिलिंडरसह ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सूरजनगर येथील एका खोलीत विनापरवाना घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा मोठा साठा करून ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस आणि तहसील प्रशासनाने संयुक्तपणे बुधवारी रात्री संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका बंद खोलीत सिलिंडरची साठेबाजी सुरू असल्याचे रंगेहाथ आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण ३० रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये २८ घरगुती वापराचे तर २ व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा समावेश आहे. या सर्व मालाची एकूण किंमत ७५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून प्रकाश सोमनदास मंगतानी (वय ६०), पराग सुरेश तिडके (वय ४४) आणि संजय शंकर घोसे (वय ४१) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत या तिघांनीही समाधानकारक उत्तरे न देता पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
साठेबाजीबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा परवानगी नसल्याने तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी नीलेश कळसकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे आणि तहसीलदार योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये डीबी पथक प्रमुख गणेश सपकाळ यांच्यासह दीपक घोगरे, रावसाहेब शेंडे, किरण पडघण, गौरव ठाकरे, पवन नांदेकर व महसूल विभागाच्या सीमा दोंदल आणि विष्णू दोळसे यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे अवैध गॅस साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.