यवतमाळ : पुढारी वृत्तसेवावाढत्या अवैध गुटखा तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय गुटखा तस्करी करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित पानमसाला व तंबाखू असा एकूण ४५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शनिवार दि.२७ रोजी रात्री गोपनीय माहितीवरून यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील पांढरकवडा तालुक्यातील ढोकी गावाजवळ सापळा रचला. युपी९४एटी २३०५ क्रमांकाच्या वाहनाला ताब्यात घेतले. वाहनातून ४५ लाख ९२ हजार रुपये किमतीचा १८० पोते सुगंधित पानमसाला व तंबाखू यासह एक मोबाईल, वाहन जप्त करण्यात आले.
याप्रकरणी मोहन सियाराम यादव (वय २६)व बुद्धा बाबुसिंग परीयार (वय ३५) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात सतीश चवरे, दत्ता पेंडकर, धनराज हाके, गजानन राजामलु, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.