Crime Pudhari
यवतमाळ

Yavatmal Crime | हिंगोलीच्या तरुणाची हत्या; आठ आरोपींना अटक

-अनोळखी मृतदेहाचा अखेर उलगडा

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस ठाणे परिसरातील सत्तरमाळ जंगलात गुराख्याला कुजलेला मृतदेह 4 ऑगस्टला आढळून आला. शवचिकित्सा अहवालानुसार त्या इसमाची हत्या केल्याचे पुढे आले.

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने ३५ वर्षीय तरुणाची  हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातून तब्बल ८ आरोपींना अटक केली आहे.

मंगेश उर्फ काल्या अर्जुन मनवर (३५, रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) असे मृताचे नाव आहे. याच परिसरात राहणाऱ्या अजय भालेराव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, यात काल्या अडसर ठरत होता. सोबत दादागिरीच्या प्रवृत्तीने परिसरातील नागरिक दहशतीत होते. हीच संधी साधून अजय भालेराव व त्याची बहीण राधा यांनी बाबू शेख (सर्व रा. हिंगोली) याच्या माध्यमातून ज्ञानेश्वर राठोड याच्यासोबत संपर्क केला.

ज्ञानेश्वरने ६ लाख रुपयांत काल्याची हत्या करण्याचा कट रचला. यात राहुल उर्फ महाराज मुकुंदा लोखंडे, श्रावण तुकाराम भवाळ, अशोक अर्जुन शेळके (तिघेही रा. वसंतनगर, उमरी, ता. मानोरा), सोमनाथ संगीत हजारे, विशाल अर्जुन राठोड (दोघेही रा. शेंदोना, ता. मानोरा), दीपक लक्ष्मण जाधव (रा. मांगकिन्ही, ता. दारव्हा), शुक्रधन उर्फ सिद्धार्थ संतोष जाधव (रा. गंगानगर, दिग्रस) यांना सहभागी करून घेतले. सुरवातीला काल्यासोबत ओळख वाढवून त्याची कमजोरी हेरली.

काल्याला दारूचे व्यसन असल्याने लक्षात येताच त्याला दारू पाजली. दारूची नशा अधिक झाल्यानंतर झिंगलेल्या अवस्थेत काल्याला दुचाकीवरून घटनेच्या दिवशी २ ऑगस्ट रोजी खंडाळा परिसरातील सत्तरमाळ जंगलात नेले गेले. तेथे त्याची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला. गुराखी ४ ऑगस्ट रोजी सत्तरमाळ जंगल परिसरात गेला असता, त्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. नंतर संपूर्ण घटनाक्रमच हाती लागला. सर्वप्रथम सुपारी घेणाऱ्या ज्ञानेश्वर राठोड याला अटक केली. त्याने कबुली दिल्यानंतर सर्व आरोपींना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT