Crime News Pudhari
यवतमाळ

Yavatmal Crime : वृद्धाचा गळा आवळून खून, दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : पैशांची देवाण-घेवाण आणि ट्रॅक्टरच्या अवजारांच्या वादातून एका ७५ वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आला. महागाव तालुक्यातील बोथा (सा) येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी दोन संशयितांना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे.

दौलत रामा गव्हाणे (वय ७६, रा. बोथा, महागाव) असे मृताचे नाव आहे. मृताचा नातू रजनीश कैलास गव्हाणे यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. दौलत गव्हाणे गावात एकटेच वास्तव्यास होते. संशयित परमेश्वर साहेबराव मोरे (वय ३०) याने दौलत गव्हाणे यांच्याकडून ट्रॅक्टरची अवजारे वापरण्यास घेतली होती; त्याचबरोबर वेळोवेळी रोख रक्कमही घेतली होती. ही अवजारे व पैसे परत करण्याच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता.

दरम्यान, गुरुवारी (ता. २३) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तक्रारदार रजनीश गव्हाणे यांना त्यांच्या आजोबांच्या घराबाबत संशयास्पद माहिती मिळाली. त्यांनी नातेवाइकांसह घटनास्थळी धाव घेतली असता, घराला बाहेरून कडी लावलेली आढळून आली. परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव होताच त्यांनी पोफाळी पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. यावेळी दौलत गव्हाणे खाटेवर मृतावस्थेत आढळून आले. पुढील तपासणीदरम्यान घराचा आतील दरवाजा तोडून पाहणी केली असता, त्यामध्ये लपून बसलेले परमेश्वर मोरे आणि विनोद कोंडबा गव्हाणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासानुसार, घेतलेले पैसे व अवजारे परत करण्यासाठी दौलत गव्हाणे यांनी तगादा लावल्याच्या रागातून आरोपींनी संगनमताने वृद्धाचे तोंड व गळा दाबून खून केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. घटनेनंतर दौलत गव्हाणे यांना पुसद येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT