यवतमाळ : मशिनरी खरेदीच्या व्यवहारात यवतमाळच्या एका कंत्राटदाराची २२ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्तीसगडमधील एका व्यावसायिकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे हा गंडा घातला असून, याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ येथील प्रगती सोसायटीत राहणारे अंकुश विजय कोटेचा (वय ३३) हे रस्ते बांधकामाचे कंत्राटदार आहेत. व्यवसायासाठी त्यांना काही जुन्या मशिनरींची आवश्यकता होती. एका मित्राच्या मध्यस्थीने त्यांची ओळख छत्तीसगडमधील भिलाई येथील 'हायवे मोटर'चे संचालक जसपालसिंग (वय ५५) यांच्याशी झाली. जसपालसिंग हा जुन्या मशिनरींच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो.
कोटेचा आणि जसपालसिंग यांच्यात दोन मशिनरी खरेदीचा सौदा निश्चित झाला. यामध्ये जेसीबी मशिन (८ लाख २५ हजार रुपये), सेल्फ लोडिंग मिक्सर मशिन (१४ लाख ७० हजार रुपये) अशा एकूण २२ लाख ९५ हजार रुपयांचा हा व्यवहार ठरला. विश्वास ठेवून कोटेचा यांनी ही संपूर्ण रक्कम जसपालसिंगने सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन ट्रान्सफर केली.
रक्कम मिळाल्यानंतर काही दिवसांनी कोटेचा यांना मशिनरीची कागदपत्रे प्राप्त झाली. मात्र, या कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोटेचा यांनी तातडीने जसपालसिंगकडे मशिनरीचे मूळ दस्तऐवज आणि फायनान्स क्लिअरन्सची मागणी केली. मात्र, संशयीत आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पाठवलेली रक्कम मशिनरीसाठी न वापरता आरोपीने ती स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी वापरल्याचे आणि बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंकुश कोटेचा यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी जसपालसिंग याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.