यवतमाळ : वडिलोपार्जित जागेच्या वादातून सख्ख्या भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या भावाचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू झाला. वणी तालुक्यातील मंदर येथे सोमवारी (दि. २१) रात्री ही घटना घडली.
मंदर येथील बुरडकर कुटुंबात वडिलोपार्जित जागेच्या मालकीवरून संतोष बुरडकर आणि त्यांचा भाऊ रवींद्र यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी रात्री याच कारणावरून दोन्ही भावांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर झटापटीत झाल्यानंतर रवींद्रने संतोष यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हल्ल्यादरम्यान चाकूचा वार मांडीवर लागल्याने संतोष गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी रवींद्र बुरडकर याला अटक केली असून ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सख्ख्या भावांमधील वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याने मंदर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.