Crime News  pudhari photo
यवतमाळ

Yavtmal crime | बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर प्राणघातक हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : अल्पवयीन बहिणीचा पाठलाग करून तिची बदनामी केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर कोयता, चाकू आणि दगडाने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना ढाणकी शहरातील मच्छी मार्केटजवळ आज शुक्रवारी घडली. या जीवघेण्या हल्ल्यात भाऊ गंभीर जखमी झाला असून, नागरिक आणि पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध ’पोक्सो’सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आई यांनी 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गावातीलच मयूर गोकूळ शिवाल (वय 20) हा सतत त्रास देत होता. ती शाळेत जात असताना पाठलाग करून बदनामी करत असल्याने कुटुंबीयांनी तिचे शिक्षण दहावीनंतर बंद करून पुण्यात मावशीकडे पाठवले. मात्र, मयूरने तिथेही जाऊन तिचा छळ सुरूच ठेवला. याचा जाब विचारणार्‍या पीडितेचा भाऊ शुभम याला मयूरने ‘तुझ्याने काय होते ते करून घे‘ अशी धमकी दिली होती.

शुक्रवारी सकाळी मयूर आणि त्याच्या काकाने शुभमला फोनवर शिवीगाळ केली. यामुळे शुभम मयूरच्या घरासमोर जाब विचारण्यास गेला असता वाद पेटला. मयूरचा काका गोपाल शिवाल याने मयूरच्या हातातील मोठा कोयता हिसकावून तक्रारदाराच्याच मुलावर वार केला. त्यानंतर मयूरने घरातून दुसरा लहान कोयता व चाकू आणून शुभमवर पुन्हा सपासप वार केले. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला, हाताला, नाकावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या.

मच्छी मार्केटजवळ भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सागर अन्नमावर, जमादार मोहन चाटे, शरद चव्हाण, राहुल कोकरे आणि सुदर्शन जाधव यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. गर्दीत मध्यस्थी करून भांडण सोडवताना पोलिस शिपाई सुदर्शन जाधव यांनाही मार लागला. पोलिसांची गाडी वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला आणि जखमी शुभमला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून मयूर शिवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT