यवतमाळ : माहूर येथे विवाह करून परतणाऱ्या एका कुटुंबावर महागाव तालुक्यातील सारखनी फाटा येथे चार अज्ञात युवकांनी जीवघेणा हल्ला करत सुमारे दोन लाखांची रोकड लुटली. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेतील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे विवाह करून परतणारी नववधूच दरोडेखोरांसोबत कारमधून फरार झाली. या संपूर्ण प्रकरणात पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील आवारे कुटुंबातील युवकासाठी यवतमाळ येथे मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम पार पडला होता. या विवाहासाठी काशिराम नावाच्या व्यक्तीने मध्यस्थी केल्याचे सांगितले जात आहे. संबंधित मुलीचे आई-वडील नसल्याचे सांगून माहूर येथील मंदिरात हार घालून विवाह लावण्यात आला. विवाहानंतर सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास नवविवाहितांसह कुटुंबीय कारने परतीच्या प्रवासाला निघाले.
प्रवासादरम्यान नववधू सतत मोबाईलवर कोणाशीतरी संपर्कात होती आणि आपले लोकेशन पाठवत असल्याचा संशय उपस्थितांनी व्यक्त केला आहे. सारखनी फाटा येथे पोहोचल्यानंतर नववधूने लघुशंकेचे कारण सांगत वाहन थांबविण्यास सांगितले. चालकाने वाहन थांबवताच मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये ती जाऊन बसली. त्याचवेळी त्या कारमधून उतरलेल्या चार युवकांनी नवरदेवाच्या कारमधील चालक व इतरांवर लाकडी दांडके आणि बाटल्यांनी हल्ला करून मारहाण केली. त्यानंतर गाडीत ठेवलेली सुमारे २ लाख रुपयांची रोकड घेऊन नववधूसह संशयित पुसदच्या दिशेने पसार झाल्याचे सांगण्यात आले.
ही घटना लग्नाचे आमिष दाखवून नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीचे कारस्थान असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या संपूर्ण कटात संबंधित नववधूचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांसह उपस्थितांकडून व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. घटनेनंतर पीडित कुटुंबाला पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात रवाना करण्यात आले.
घटनेनंतर पीडितांनी तातडीने ११२ आपत्कालीन सेवा क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितल्याचा दावा केला. मात्र, वारंवार संपर्क करूनही पोलिस वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ‘११२ ही आपत्कालीन यंत्रणा कुचकामी ठरत आहे,’ अशी तीव्र नाराजी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. या प्रकरणात संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.