Ganja Pudhari
यवतमाळ

Yavatmal Ganja Seizure : अमली पदार्थांच्या शेतीचा डाव उधळला; २३.६९ लाखांचा गांजा जप्त

घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा शिवारात कारवाई; शेतात आढळली गांजाची ११० झाडे

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात अमली पदार्थांच्या शेतीचा डाव पोलिसांनी उधळून लावला. पाटापांगरा शिवारातील शेतात गांजाची ११० झाडे आढळून आली. पोलिसांनी ही झाडे मुळासह जप्त केली असून, त्यांची किंमत २३ लाख ६९ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी विनू वसंता झाडे (वय ४८, रा. पारधी बेडा, घोटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक गोपाळ राठोड यांनी ही माहिती ठाणेदार हेमंत चौधरी यांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.

नायब तहसीलदार वीरेंद्र सोळंके यांच्या उपस्थितीत पोलिस, महसूल, वन आणि वजनमापे विभागातील अधिकारी-कर्मचारी, पंच तसेच छायाचित्रकारांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले. या पथकाने संबंधित शेताची झडती घेतली असता कापूस आणि तुरीच्या २३ ओळींमध्ये गांजाची ११० झाडे आढळून आली. या झाडांच्या मुळांजवळ खत टाकण्यात आल्याचेही निदर्शनास आले.

पथकाने गांजाची झाडे मुळासह उपटून काढली. त्यानंतर शासकीय वजनमापकाच्या उपस्थितीत त्यांचे वजन करण्यात आले. पुढील प्रक्रियेत झाडांची पाने, फुले आणि बोंडे वेगळी करून संपूर्ण मुद्देमाल सीलबंद करण्यात आला.

या कारवाईत पोलिस शिपाई अमोल वाढई, भानुदास हेपट, वनरक्षक अक्षय तोडसाम आणि विठ्ठल वेट्टी यांच्यासह संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन बास्टेवाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT