चेतना जाधव आणि मनोज जाधव Pudhari
यवतमाळ

Arni Taluka Crime: मटण अर्धवट शिजल्याच्या वादातून संसार उद्ध्वस्त; पतीच्या अपमानानंतर पत्नीची आत्महत्या

Yavatmal crime news | ‘मटण नीट शिजले नाही’ या कारणावरून पतीने पाहुण्यासमोर केलेल्या अपमानामुळे निराश झालेल्या पत्नीने विष प्राशन केले

पुढारी वृत्तसेवा

Married woman death Arni Yavatmal

यवतमाळ : एका किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या भांडणातून अखेर एका विवाहितेने जीव गमावल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. ‘मटण नीट शिजले नाही’ या कारणावरून पतीने पाहुण्यासमोर केलेल्या अपमानामुळे निराश झालेल्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चेतना मनोज जाधव (वय 33) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतना जाधव यांचे पती मनोज जाधव यांनी आपल्या एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. त्यासाठी पत्नीला मटणाचा बेत करायला सांगितला होता. घराच्या अंगणात जेवत असताना मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून पतीचा संताप अनावर झाला. पाहुण्यासमोरच त्याने पत्नीशी वाद घातला. हे शाब्दिक प्रहार इतक्यावरच थांबले नव्हते. दारुच्या आहारी गेलेल्या पतीचा संशयी स्वभाव होता. त्याने यावरुनही पत्नीला शिवीगाळ केली.

पती मनोज जाधव याला दारूचे व्यसन असल्याचा दावा मयत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. यापूर्वी 2015 मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये ‘संसार पुन्हा सुरळीत करण्याच्या’ आशेने चेतनाने त्याला माफ केले होते.

मात्र, बुधवारी झालेला अपमान चेतनाला हादरवून सोडणारा ठरला. जेवण अर्धवट सोडून ती घरात गेली आणि विष प्राशन केले. काही वेळाने बाहेर येऊन तिने पतीला ही बाब सांगताच घरात एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी चेतनाचे मामा मनोहर राठोड (रा. देवगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती मनोज जाधव याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घटनेनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT