यवतमाळ : शेतकऱ्यांचा शेतमाल बेभाव विकला जातो, याचा प्रत्यय येथील भाजी बाजारात दि.१ जानेवारीला नवीन वर्षाच्या पहाटे अनुभवास आला.पुसद तालुक्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या टमाटर व वांग्याचा व्यापाऱ्यांनी दहा रुपये कॅरेट प्रमाणे लिलाव करताच शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आपला भाजीपाला व्यापाऱ्याला न विकताच अक्षरशः फेकून दिला होता.
पुसद शहराच्या सभोवतीला सिंचनाची सुविधा असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकवतात. काही शेतकरी भाजीपाल्यात निष्णात झाले आहेत. पुसद तालुक्यातील आरेगाव, निंबी, पारडी, जांब बाजार, हर्षी, लोहरा इजारा, इंदापूर, आमटी अशा अनेक खेड्यातून दररोज शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येथील भाजी बाजारात भल्या पहाटे आणतात.
आधीच्या रात्रीच भाजीपाला स्वच्छ करून सकाळी विक्रीसाठी बाजाराची वाट धरतात. हिवाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळे भाजीपाल्याला चांगले दाम मिळत नाही. भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजी उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. अशातच काही शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेले टमाटर व वांगी बुधवार दि. १ जानेवारीला भाजी बाजारात आणले. मात्र, व्यापाऱ्यांनी केवळ दहा रुपये कॅरेटप्रमाणे टमाटर व वांगीचा लिलाव केला.
एका कॅरेटमध्ये साधारणतः २५ किलो टोमॅटो व वांगी बसतात. १० रुपये कॅरेटप्रमाणे लिलाव होत असल्याने प्रति किलो ४० पैसे भाव शेतकऱ्यांच्या हाती पडले. टमाटर, वांगी तोडण्यासाठी महिला मजुरांना ३०० रुपये रोज द्यावे लागतात. त्यात वाहतूक व उत्पादन खर्च यांचा कुठेही मेळ बसत नाही. एवढ्या कमी भावात शेतातून भाजी बाजारात भाजीपाला आणनेही परवडत नसल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले. शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागत असल्याने शेवटी संतप्त झालेल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी आपले टमाटर व वांगे बाजारातील रस्त्यावर फेकून दिले. त्यामुळे काहीकाळ वातावरण तापले होते.