यवतमाळ : माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत उलटला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी दिग्रस तालुक्यातील देऊरवाडी (पुनर्वसन) येथील पेट्रोल पंपाजवळ घडली.
आर्णी तालुक्यातील नाथनगर येथील प्रवासी एमएच 17, एझेड 2553 क्रमांकाच्या ऑटोने प्रवास करीत होते. दिग्रस-आर्णी मार्गावरील देऊरवाडी पेट्रोल पंपाजवळ येताच अचानक एक माकड आडवे आले. त्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नालीत जाऊन पलटी झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली.
अपघातात जखमी झालेल्यांना बाहेर काढून लगेच दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात आर्णी येथील नाथनगरातील रहिवासी पुष्पा तांबे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.