यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील वणी-यवतमाळ मार्गावर बुधवारी (दि.१४) काळाने घाला घातला. उमरी गावाजवळ सिमेंट वाहून नेणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा जागीच करुण अंत झाला, तर एक तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरहून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकने (MH 34 BZ 2932) समोरून येणाऱ्या दुचाकीला (MH 29 CF 0773) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला. यामध्ये विकास ज्ञानेश्वर सलाम (वय २६) आणि पायल रोशन कुंभारे (वय २४) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात तनुजा राजू वाघाडे (वय १९) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पांढरकवडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातामुळे वणी-यवतमाळ मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.