यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी-माणोली मार्गावर मंगळवारी (दि. १७) रात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनावर जोरात धडकली. या दुर्दैवी घटनेत दोन तरुण मित्रांचा मृत्यू झाला असून, आकपुरी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकपुरी येथील रहिवासी असलेले गजानन आडे (वय २६) आणि प्रज्वल कचाडे (वय २९) हे दोघेही मंगळवारी रात्री काही कामानिमित्त घाटंजी येथून माणोलीमार्गे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच २९ डी १७८८) जात होते. रात्रीची वेळ असल्याने आणि दुचाकीचा वेग अधिक असल्याने माणोली गावाजवळ असलेल्या एका धोकादायक वळणावर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. याच वेळी समोरून एक चारचाकी वाहन येत होते. दुचाकी थेट या चारचाकीवर जाऊन आदळल्याने मोठा आवाज झाला आणि दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही युवक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमा खोल असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
दुर्दैवाने, यवतमाळला उपचारासाठी नेत असताना वाटेतच गजानन आडे याची प्राणज्योत मालवली. दुसरीकडे, प्रज्वल कचाडे याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मृत्यूशी झुंज देत असताना बुधवारी (दि. १८) सकाळी उपचारादरम्यान प्रज्वलचाही मृत्यू झाला.
एकाच गावातील दोन कर्तबगार तरुणांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ज्या वळणावर हा अपघात झाला, तिथे यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या धोकादायक वळणावर गतिरोधक बसवावेत किंवा आवश्यक त्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून आता तीव्रतेने केली जात आहे.