यवतमाळ : काळाने घातलेल्या घावाने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मारेगाव तालुक्यातील वांजरी गावचे माजी सरपंच बंडू सिडाम आणि त्यांच्या पत्नी तथा माजी उपसरपंच सविता सिडाम यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मारेगाव-करंजी महामार्गावरील जळका फाट्याजवळ बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत सविता सिडाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या बंडू सिडाम यांची नागपूरला उपचारासाठी नेत असताना वाटेतच प्राणज्योत मालवली. काही तासांच्या अंतराने पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांजरी गावचे माजी सरपंच बंडू सिडाम हे पत्नी सविता सिडाम यांच्यासह दुचाकीवरून मारेगावच्या दिशेने जात होते. दरम्यान, मारेगावकडून करंजीच्या दिशेने जाणाऱ्या कारची जळका फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात सविता सिडाम यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बंडू सिडाम हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमी बंडू सिडाम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी नागपूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूरच्या दिशेने नेत असतानाच वाटेत त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. पत्नीच्या मृत्यूचा धक्का कुटुंबीयांना सहन होत असतानाच काही तासांत पतीचाही मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि सिडाम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
बंडू सिडाम हे वांजरी गावचे माजी सरपंच असल्याने गावात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्यामुळे गावात त्यांची ओळख होती. या दाम्पत्याच्या निधनाचे वृत्त समजताच वांजरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकत्र आयुष्याची वाटचाल करणाऱ्या पती-पत्नीचा एकाच अपघातात असा दुर्दैवी अंत झाल्याने गावकऱ्यांमधून शोक व्यक्त होत आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे मारेगाव-करंजी महामार्गावरील वाहनांचा वेग, चौक आणि फाट्यांवरील सुरक्षितता तसेच अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.