यवतमाळ : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून एका महिलेची ४७ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. ही धक्कादायक घटना शहरातील वाघापूर परिसरातील संभाजी नगरात घडली. या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंकज महादेवराव इंजेवार (वय ४०, रा.अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, ज्ञानेश्वरी रूपनर (शेडगे) यांना पंकज इंजेवार याने आकर्षक व्याज मिळून देण्याचे आमिष दाखवून ४७ लाख रूपये मुदत ठेवीकरीता घेतले होते. पंकज इंजेवार याने ज्ञानेश्वरी रूपनर यांना बनावट मुदत ठेवीचे तीन बॉन्ड देवून त्यांची ४७ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी ज्ञानेश्वरी रूपनर यांनी लोहारा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी पंकज इंजेवार याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. याबाबतचा पुढील तपास ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.