वणी : वणी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळले आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, अंदाजे २०० ते २३५ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष पीक गंभीरपणे बाधित झाले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर-ऑक्टोबर हा द्राक्ष छाटणीचा कालावधी असून छाटणीनंतर झाडांमधून कोंब फुटतात, त्यातूनच पुढे द्राक्ष घडांची निर्मिती होते. याच टप्प्यावर सततच्या पावसाने व ढगाळ वातावरणामुळे या निर्मिती प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाच्या तडाख्याने कोंबांना “पोंग्या” अवस्थेतून बाहेर पडण्यास अडचण येत आहे, तसेच बाहेर आलेले कोंब आणि फुलोरे कुजत आहेत. परिणामी, द्राक्ष उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.
या संदर्भात उपसरपंच विलास कड यांनी सांगितले की, “परिसरात आज जरी नुकसान स्पष्टपणे दिसत नसले तरी प्रत्यक्षात ७० टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. फुलोऱ्यात आलेल्या बागांतील फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली असून, पोंग्यातून बाहेर पडणारे द्राक्ष घड पावसाच्या फटक्याने कुजले आहेत.”
शेतकरी बाळासाहेब घडवजे यांनी सांगितले की, “१७ ते १८ एकर द्राक्ष बागांपैकी केवळ ४ ते ५ एकरांवरील बाग काही प्रमाणात टिकून आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी द्राक्षांचे उत्पादन फक्त ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पुढील वातावरणीय बदल काय परिणाम करेल हे सांगता येत नाही.”
सततच्या ढगाळ वातावरणाने व अप्रत्याशित पावसाने वणी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे केले आहे. आता आगामी हवामानावरच द्राक्ष उत्पादकांच्या आशा टिकून आहेत.