यवतमाळ : शेतात नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील जनुना शिवारात रविवारी (दि.११) सकाळी ही घटना घडली. गजानन केरबा थोरात (वय ३२) असे मृताचे नाव आहे.
गजानन थोरात यांच्या मालकीचे ट्रॅक्टर आहे. ते स्वतःच ट्रॅक्टर चालवायचे. जनुना येथीलच दादाराव दवणे यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करण्यासाठी ते रविवारी सकाळी गेले होते. शेतात नांगरणी करताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली सापडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार धनराज निळे यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाठविले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला.