Yavatmal bus stand youths arrested with ganja
यवतमाळ : यवतमाळ बसस्थानकावर गांजाची खेप येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा लावला. एक निळ्या रंगाची सुटकेस आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने क्षणाचाही विलंब न करता याची वरिष्ठांना माहिती देऊन छापा कारवाईची तयारी केली. वर्धा येथून आलेल्या बसमधून उतरलेल्या युवकाची झडती घेतली असता, त्याच्याजवळ सहा किलो गांजा हाती लागला.
बेस्तव हरा प्रधाण (वय ३१, रा. पानासाही, पो.स्टे. कडलीमुंडा, तहसील कुसुनि, जि. अंगुल, राज्य ओरिसा), प्रशांत रामदास गावंडे (४९, रा. हरणे लेआऊट, रासा रोड, कळंब), हरिओम बाबुलाल ठाकूर (३३, रा. बालाजी चौक, यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. बेस्तव हरा प्रधाण हा ओरिसा येथून गांजाचा यवतमाळ जिल्ह्यात पुरवठा करत होता. गांजा खरेदीसाठी प्रशांत व हरिओम यवतमाळ येथे आले होते.
एलसीबी पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६ किलो ३०० ग्रॅम गांजा जप्त केला. ज्याची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. आरोपींकडून दोन मोबाईल जप्त केले. आरोपींविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत जिंदमवार हे करीत आहेत.