child fatal accident
यवतमाळ : अज्ञात वाहनाची जबर धडक बसल्याने तीन वर्षीय नातीचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा गंभीर जखमी झाले. तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बोरी ईचोड येथे ही घटना आज बुधवार दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता घडली.
नायरा रमेश कुमरे असे मृत नातीचे नाव आहे तर तिचे आजोबा गुणवंत परचाके (वय ४४) हे गंभीर जखमी झाले आहे. हे दोघेही वडकी येथून बोरीकडे महामार्गावरून पायदळ येत होते. याच दरम्यान वडकी जवळील हनुमान मंदीराजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात अपघातात नायराचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा गुणवंत परचाके गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरकडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आला. पुढील तपास वडकी पोलिस करीत आहे. या अपघाताला राष्ट्रीय महामार्गावरील ऐकेरी वाहतुक कारणीभूत असल्याचा आरोप होत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल घटनास्थळी उपस्थित नागरिक करीत होते.