यवतमाळ : दोन चोरट्यांनी कापड दुकानांमध्ये चोऱ्या करून स्वतःचाच कापड व्यवसाय थाटला. असे म्हटल्यास कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अवधूतवाडी पोलिसांनी गुरूवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी केली.
तेजस बळीराम चव्हाण (३३) रा. घाटूंबा आणि प्रमोद साहेबराव चव्हाण (२४) रा. घोटी, अशी अटकेतील दोन चोरट्यांची नावे आहेत. काहीदिवसांपूर्वी शहरातील नेताजी मार्केट आणि माईंदे चौक परिसरातील एका पाठोपाठ एक अशी चार कापड दुकाने फोडली होती. तसेच दुकानातून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी व्यावसायिकांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले होते.
दरम्यान गोपनीय माहितीवरून पोलिसांनी संशयित तेजस चव्हाण आणि प्रमोद चव्हाण या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्या दोघांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबूली दिली. कापड दुकानातून चोरलेल्या कपड्यांच्या माध्यमातून स्वतःचे दुकान थाटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. परंतु चोरट्यांचा हा डाव अवधूतवाडी पोलिसांनी उधळला.
गजाआड केलेल्या आरोपींकडून दोन मोटारसायकल, कुलूप कापायचे कटर, चार्जिंग बॅटरीसह असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने,गजानन वाटमोडे, मोहम्मद भगतवाले, रशीद शेख, योगेश चोपडे यांनी केली.