यवतमाळ

पोलिस असल्याचे सांगून सोन्याची अंगठी पळविली

backup backup
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून एका इसमाला अडवून त्याच्या हातातील सोन्याची अंगठी लांबविली. ही घटना महागाव पोलिस ठाण्याअंतर्गत कोठारी-मुडाणा दरम्यान शुक्रवारी घडली.
कोठारी येथील भीकमचंद सवाईराम राठोड हे मुडाणा येथे जात होते. अज्ञातांनी त्यांना रस्त्यात अडविले आणि पोलिस असल्याची बतावणी करीत त्यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लांबविली. चोरट्यांनी तुमच्या हातातील अंगठी दाखवा, असे म्हणून अंगठी काढून मागितली. ती पाहिल्यानंतर तुमची अंगठी तुमच्या पिशवीत टाकली असे सांगून भीकमचंद राठोड यांना जाण्यास सांगितले. भीकमचंद यांनी आपली थैली तपासली असता त्यात अंगठी दिसली नाही. आपली अंगठी संबंधितांनी चोरली आणि पळून गेले अशा आशयाची तक्रार महागाव पोलिसांकडे करण्यात आल्याने पोलिसांनी त्या आरोपी विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवार हा महागाव येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे अनेक खेड्यातून या ठिकाणी बाजाराकरिता नागरिक येत असतात बऱ्याच वेळा बाजारामध्ये मोबाइल, पैसे चोरी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. निदान बाजाराच्या दिवशी तरी पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
SCROLL FOR NEXT