यवतमाळ : उन्हाळ्याची चाहूल लागताच पुसद तालुक्यातील माळपठारावरील अनेक गावात पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. वारवार विनंत्या, आर्जव करूनही पाणीटचाई दूर होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी हातात घागरी घेत थेट सरपंचाचे हात दोराने बांधून उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.
पुसद तालुक्यातील माळपठारवरील पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप घेत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच माळपठारावरील गावोगावातील नदी, नाले, विहिरी कोरड्या पडत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच माळपठारवरील गावांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सन २०१२ पासून या गावात जलजीवन मिशनचे काम सुरु आहे. परंतु ते अद्यापही पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे. त्यामुळे पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथील महिला व पुरुषानी पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरपंच यांचे हात दोरीने बांधून घरातील घागरी घेऊन मंगळवारी सकाळी ११ वाजता पुसद येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात धडक दिली आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. यानंतर तहसील आणि पंचायत समितीत जावूनही आदोलन केले.
यावेळी गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व दोन तास आदोलकांशी चर्चा केली. जलजीवन मिशन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून आंदोलकांच्या समस्या माडल्या. परंतु, सर्व अधिकाऱ्यानी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. दुपारी २ पासून सायकाळी ५ वाजेपर्यंत हे आदोलन सुरुच होते. परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे यावेळीसुद्धा नागरिकांच्या हातात निराशाच आली. स्वच्छ पिण्याचे पाणी ही नागरिकांची मुलभूत गरज असताना राज्यमंत्र्यांच्या मतदार संघात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आआंदोलन करावे लागत आहे. ही खेदाची बाब असल्याचा सूर आंदोलन करणाऱ्यांतून उमटत होता.
मी निवडणुकीत उभा होतो तेव्हा नागरिकांना ६ महिन्यांच्या आत पाण्याची समस्या निकाली काढून देईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, जलजीवन मिशनचे काम संथगतीने सुरू आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच गावकरी माझ्यावर रोष व्यक्त करतात. माझ्या घरासमोर रोज येऊन मला आश्वासनाची आठवण करून देतात. नाईलाजास्तव आज त्यानी मला बेईमान सरपंच म्हणत माझ्या हाताला दोऱ्या बांधून उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले.प्रताप विठ्ठल बोडखे, सरपंच, ग्रामपंचायत सावरगाव गोरे