हिवरी शिवारात अपघातात खासगी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.  Pudhari Photo
यवतमाळ

कोल्हापूर येथून निघालेल्या खासगी बसला यवतमाळमध्ये भीषण अपघात; ३५ प्रवासी जखमी

Yavatmal Accident News | हिवरी शिवारात घटना

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथून निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकली. या अपघातात ३५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. यवतमाळ येथून १२ किमी अंतरावर असलेल्या व ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरी शिवारात आज (दि. २४) पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांसह पोलिसांनी धाव घेऊन प्रवाशांना रुग्णवाहिकेव्दारे शासकीय रुग्णालयात दाखल केले. (Yavatmal Accident News)

कोल्हापूर येथून रविवारी (दि. २३) एमएच ४० सीएम ५०३५ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स प्रवासी घेऊन निघाली होती. सोमवारी पहाटे हिवरी शिवारात येताच भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन थेट दुभाजकावर जाऊन आदळले. अपघात इतका भीषण होता की, चालक हा स्टेअरिंगसह समोरचा काच फोडून बाहेर फेकला गेला. तर वाहनाचे इंजिन थेट प्रवासी दरवाजाजवळ येऊन धडकले. त्यामुळे वाहनाच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. यात वाहनातील ३५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेची माहिती मिळताच हिवरी येथील संदीप चेके, ओंकार चेके, सुखदेव साठे, बबन चेके, अविनाश चेके, विशाल चेके, संतोष येवले, विनोद येवले, विनोद चेके यांच्यासह वाहतूक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, ग्रामीणचे ठाणेदार प्रशांत कावरे आपल्या वाफ्यासह घटनास्थळी पोहोचले. या सर्वांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढून पाच रुग्णवाहिके व्दारे यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

जखमींमध्ये राजेंद्र उट्टलवार, अर्णव राजेंद्र उट्टलवार, योगेश नावलकर, अविनाश ढोबळे, गुलाब सिंग, रवी जाधव, सोनू नांद, नितिन शिवणकर, नितीन श्रीरामे, वैशाली जोशी, दीपक कुमार, महेशकुमार, आकाश नागरजोगे, शिवांश चावरे, वसंता भीतकर, एम.आर. बिलाल, राकेश भागवत, प्रज्योत, सुधीर पाटील, उमा शिवणकर, विशाल पेटूकले, विशाल मात्रे, कमला कोमेकर, जवेंद्रसिंग हरदयसिंग, अब्दुल हक अब्दुल शकील, गिरीश मिश्रा, ईश्वर आडे, शामबाला माळी, बबली मिश्रा, शिल्पा चन्ने, प्रविण पवार, रवींद्र वानखडे, धनराज चोरे आदींसह इतर प्रवाशांचा समावेश आहे. नागपूर, यवतमाळ, सांगली, भंडारा, वर्धा, कोल्हापूर, लातूर, जयपूर आदी जिल्ह्यातील प्रवासी प्रवास करीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT