झारखंडमधील नक्षली नेत्याला एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. Pudhari Photo
यवतमाळ

२० वर्षांपासून फरार नक्षली नेता एलसीबीच्या जाळ्यात

उमरी येथून घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : सन २००५ पासून फरार असलेल्या आणि यवतमाळ जिल्ह्यात चालक म्हणून काम करणाऱ्या झारखंडमधील नक्षली नेत्याला एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (दि.१८) पांढरकवडा तालुक्यातील उमरी येथे करण्यात आली. तुलसी उर्फ दिलीप महतो (वय ४७ वर्ष रा. रानी सती मंदीर परिसर, यवतमाळ) असे त्या नक्षली नेत्याचे नाव आहे. त्याच्यावर विविध स्वरूपाचे सात गंभीर गुन्हे दाखल आहे. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी बुधवार दि. १९ फेब्रुवारीला आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

झारखंड येथील नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतो हा यवतमाळ जिल्ह्यात लपून असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याची शोधमोहीम राबवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत त्याला मंगळवारी पांढरकवडा तालुक्यातील उमरी येथील स्टोन क्रशर परिसरातून ताब्यात घेतले. दरम्यान झारखंड पोलिसांकडून याबाबत माहिती घेतली असता, तो २००५ पासून फरार असल्याची बाब तपासात समोर आली. तोच नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतो असल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक सतीश चवरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, पथकातील सैयद साजीद, बंडु डांगे, रवी नेवारे, रूपेश पाली, योगेश डगवार, आकाश सुर्यवंशी, राजकुमार कांबळे, देवेंद्र होले, योगेश टेकाम, धनंजय श्रीरामे, महेश वाकोडे यांनी पार पाडली.

हत्येच्या भितीपोटी गाठले यवतमाळ

झारखंड येथील एका कमांडर सोबत पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे आता आपली हत्या करणार म्हणून नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतो याने सन २००५ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव गाठले. त्या ठिकाणी तो नातेवाईकासोबत लोखंडी पोल उभे करण्याचे काम करीत होता. या कामादरम्यान त्याचे यवतमाळ येणे जाणे सुरू झाले. दरम्यान, सन २०१३ मध्ये त्याने यवतमाळातील फेब्रीकेशनचे काम सुरू केले. त्यानंतर गेल्या सहा ते सात महिन्यापासून तो पांढरकवडा तालुक्यातील उमरी परिसरातील एका स्टोन क्रशरवर चालक म्हणून काम करीत होता.

बनावट आधार कार्डद्वारे पोलिसांची दिशाभूल

संशयित नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतो हा लपून असलेल्या पांढरकवडा तालुक्यातील उमरी परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्याला घेराव घातला. यावेळी त्याने पोलिसांकडे बनावट आधारकार्ड सादर करून खोटी ओळख देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याच्या संशयास्पद वर्तणुकीमूळे त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता, त्याने स्वत:ची खरी ओळख देत नक्षलवादी कारवायांमध्ये स्वत: सहभागी असल्याचे मान्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT