Yavatmal bike theft : दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, १५ लाखांच्या १६ गाड्या जप्त Pudhari Photo
यवतमाळ

Yavatmal bike theft : दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, १५ लाखांच्या १६ गाड्या जप्त

लोहारा पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ:  लोहारा पोलिसांनी एका मोठ्या आंतरजिल्हा दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. बुधवारी (दि.6) रात्री केलेल्या या धडक कारवाईत आरोपींकडून तब्बल १६ चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या मुद्देमालाची किंमत अंदाजे १५ लाख ३० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे यवतमाळसह अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

एका माहितीवरून लागले टोळीचे धागेदोरे

मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी (ता. ६) रात्री वाघापूर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना विना क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन संशयित तरुण फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या तरुणांची कसून चौकशी केली असता, त्यांनी ती दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी अधिक तपास केला असता, या गुन्ह्यात त्यांचा तिसरा साथीदार आर्णी नाका परिसरातील आदित्य राऊत याचाही सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ त्यालाही ताब्यात घेतले. या तिघांनी मिळून केवळ यवतमाळच नव्हे, तर लगतच्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव आणि अमरावती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही अनेक दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. निलेश श्रावण मुनेश्वर (वय ३२), गणेश विलास उले (वय २०), आदित्य प्रकाश राऊत (वय २०) अशी त्यांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी एकूण १६ दुचाकी जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत १५ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे, संतोष आत्राम, बबलू पठाण, प्रशांत राठोड, नकुल रोडे, पवन चिरडे, उमेश प्रधान, कल्पेश रामटेके आणि अतुल चव्हाण यांचा समावेश होता. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT