यवतमाळ : कळंब तालुक्यातील रासा येथे एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड केली, तसेच जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या आजी-आजोबांना बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी दोषी ठरवत चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. १८ ऑगस्ट रोजी या खटल्याचा निकाल लागला.
संतोष रंगराव घोटेकार (वय ३७, रा. रासा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २०२० मध्ये रात्री घराबाहेर पडलेल्या पीडित अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तिने विरोध दर्शवताच तिला मारहाण करण्यात आली.
पीडितेने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिचे आजोबा आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने त्यांना मारहाण करून जखमी केले. हा वाद सोडवण्यासाठी पीडितेची आजी मध्ये पडली असता, आरोपीने तिलाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी संतोष घोटेकारविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक सरिता मरकाम यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता चंद्रशेखर डाहे यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले.
प्रत्यक्षदर्शींचे पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पॉक्सो (POCSO) कायदा कलम ८ अंतर्गत दोषी ठरवले. त्यानुसार त्याला चार वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या न्यायालयीन प्रक्रियेत पैरवी अधिकारी म्हणून पोलीस जमादार विजय कुडमेथे यांनी सहकार्य केले.