यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वर्धा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री धाड टाकली. पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत रेतीने भरलेले ११ डंपर, दोन ट्रॅक्टर बोटी, एक पोकलँड मशीन असा जवळपास दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राळेगाव तालुक्यातील काही रेती घाटांचा शासनाने लिलाव केला असला तरी अनेक ठिकाणी नियमांना फाटा देत दिवस-रात्र अवैध रेती उपसा सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी मध्यरात्री अचानक येवती परिसरातील रेती घाटावर छापा टाकला. यावेळी वर्धा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत रेतीने भरलेले डंपर, पोकलँड मशीन व अन्य साहित्य असा एकूण १ कोटी ४२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेली वाहने व साहित्य वडकी पोलिस ठाण्यात लावण्यात आली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.