यवतमाळ : अकोला बाजार परिसरातील पिंप्री बुट्टी येथे जनावरांच्या तीन गोठ्यांना भीषण आग लागली. यामध्ये चार शेळ्यांसह दोन गायींचा होरपळून मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी (दि.२१) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
विठ्ठल जोगी, रूपेश ताजणे आणि विजय सलाम (रा. पिंप्रीबुटी) अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच धावपळ केली. तसेच नागरिकांनी, युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. यावेळी विजय सलाम यांच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे पीएसआय भाऊराव बोकडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. स्थानिक प्रशासन तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तर वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजीव खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भाऊराव बोकडे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या भीषण आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेततकऱ्याला तरातडीने मदत व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या दुर्घटनेत शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.