उमरखेड : तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा काॅग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी दौरा केला. पळशी, मार्लेगाव, चातारी व दराटी गावांमध्ये जाऊन त्यांनी पुरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत गंभीर असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत तसेच शेतजमिनी खरडून निघाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पुरात खरडलेल्या शेतजमिनींसाठी प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये सरसकट मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
यानंतर ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामदेव सरकार काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल सोनू खतीब अनिल कदम अतुल पाटील खाजाभाई कुरेशी अंबादास धुळे आदि सह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.