यवतमाळ : वणी शहरातील एका महिलेची सोशल मीडियावरून ओळख करून घेत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार गजानन काकडे (वय अंदाजे 30, रा. पुसद) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिलेची ओळख करून घेत तिच्याशी मैत्री केली. पुढे या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. या काळात आरोपीने विविध ठिकाणी नेऊन फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप आहे. दरम्यान, महिलेने पुढील संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे फोटो व व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्या करून तिचे नाव घेण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार १५ ऑक्टोबर २०२४ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले.
फिर्यादीचा जबाबीअहवाल प्राप्त होताच सोमवारी मध्यरात्री संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला पुसद येथून अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश अपसुंदे व प्रियंका चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवी करत आहेत.