Lift Seeker Robbery
यवतमाळ : दुचाकीस्वारास दोन अनोळखी व्यक्तींनी लिफ्ट मागितली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत चक्क चाकू लावून लुटल्याची घटना दिग्रस तालुक्यातील वाई मंढला येथे मंगळवारी (ता. १९) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी आरोपींनी दुचाकीस्वाराजवळील रोख, मोबाईल आणि दुचाकी, असा मिळून ८६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी शनिवारी (ता. २३) प्रवीण रामचंद्र वांझाड, रा. तुपटाकळी, दिग्रस यांनी दोन अनोळखी चोरट्याविरोधात दिग्रस पोलिसांत तक्रार दिली. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी प्रवीण वांझाड हे दुचाकी (क्र. एमएच २९, सीडी १२११) ने दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी या गावाच्या दिशेने जात होते. दरम्यान, रात्रीच्या वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी हात दाखवून त्यांना लिफ्ट मागितली. तुपटाकळीपर्यंत घेऊन जावे, अशी विनंती केली.
या विनंतीला मान देऊन प्रवीण वांझाड यांनी दोघांना लिफ्ट दिली. त्यातील एका आरोपीला दुचाकी चालविण्याकरिता देत स्वतः मध्ये बसले आणि तिसऱ्याला मागच्या बाजूने बसविले होते. त्यानंतर गावाच्या दिशेने निघताना वाई मेंढीजवळ दुचाकी थांबवून अंधाराचा फायदा घेत मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावून मारहाण केली.
त्यांच्या खिशातील रोख ११ हजार रुपये, पाच हजार रुपयांचा मोबाईल आणि ७० हजार रुपयांची दुचाकी, असा मिळून ८६ हजारांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पळ काढला. या घटनेने भयभीत झालेल्या प्रवीण वांझाड यांनी शनिवारी दिग्रस पोलिस ठाणे गाठून दोन अनोळखी चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.