यवतमाळ : गॅस गळती होऊन घरात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी कळंब येथील प्रभाग क्रमांक सात धनगरपुरा येथे घडली. यामध्ये पाच मुलींसह एक महिला जमखी झाली. समीक्षा मारोती निकोडे (१४), स्नेहा मारोती निकोडे (८), चैताली गजानन मते (१२), लावण्या गजानन मते (१०), काव्या सोनुले (९), सुनीता ज्ञानेश्वर मते (६०), रा. सर्व धनगरपुरा अशी जखमींची नावे आहे.
मारोती निकोडे व त्यांची पत्नी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या दोन मुली समीक्षा व स्नेहा या घरासमोर खेळत होत्या. दरम्यान त्यांच्या घरी तिच्या मैत्रिणी चैताली, लावण्या व काव्यादेखील तेथे आल्या. या मुलींजवळ सुनीता मते बसून होत्या. अचानक निकोडे यांच्या घरातून धूर बाहेर येऊ लागला. हे नेमके काय घडले, हे पाहण्यासाठी खेळणाऱ्या मुली व सुनीता मते यांनी घरात पाऊल ठेवले, त्याच वेळी आगीचा लोळ उठला. कसाबसा त्यांनी बाहेर पळ घेतला. यात सहा जणींचे पाय भाजले गेले. आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले. जखमींना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
आगीची घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत आग आटोक्यात आणली. आजूबाजूला कुडाची घरे आहेत. त्यामुळे आग पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता. प्रथमदर्शनी गॅसगळती झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. गळती झालेला गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यानंतर भडका उडाल्याचे सांगितले जाते. या आगीमध्ये घरातील टीव्ही, फॅन, धान्य, कपडे, संपूर्ण भांडे व इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार धीरज स्थूल यांनी तातडीने तलाठी राजेश चौधरी यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले