यवतमाळ

यवतमाळ : गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; लाखोंचा ऐवज जाळून खाक

दिनेश चोरगे

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पांढरकवडा येथील वैभव नगरमध्ये एका घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन संपूर्ण घर बेचिराख झाले. सुदैवाने घटनेच्यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे जीवित हानी टळली. ही घटना शनिवारी (दि.१५) घडली.

येथील शाहू विद्यालयाजवळ असलेल्या वैभवनगरमधील हेमंतकुमार काशिनाथ मुजारिया यांनी त्यांच्या घरी शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे पूजा करून देवासमोर दिवा लावला. त्यांची पत्नी माहेरी गेल्यामुळे ते एकटेच घरी होते. काही वेळाने ते घराला कुलूप लावून धान्य आणण्यासाठी रेशनच्या दुकानात गेले. त्यांच्या घराशेजारीच रमेश कोरडे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. तेथील मजुरांना या घरातून धूर येताना दिसला. त्यानंतर काही वेळाने आगीच्या ज्वाळादेखील बाहेर निघताना दिसून आल्या. घराला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सूचना दिल्या. शेजारच्यांनी मुजोरिया यांनाही याची माहिती दिली. लगेच काही क्षणात मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले. स्फोटाच्या आवाजामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली. आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या. परंतु, तातडीने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, मुजारिया यांचे संपूर्ण घर मात्र, आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत घरातील फ्रिज, शिलाई मशीन, टीव्ही, कूलरसह लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. मात्र स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

SCROLL FOR NEXT