Arni taluka electric shock worker dies
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागातील माळेगाव येथील पंकज प्रभू बुटले (वय २५) या विद्युत सहायकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
माळेगाव या गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर जाणाऱ्या पोलवरील तुटलेली विद्युत तार जोडण्यासाठी पंकज पोलवर चढला होता. त्या तारेत अचानक वीज प्रवाहित झाली. त्यामुळे त्याला विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला आणि तो थेट पोलवरून खाली पडला. पोलच्या खाली मोठ्या प्रमाणात दगड असल्याने पडताना त्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या विद्युत कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. युवक विद्युत कंपनीकडे रोजमजूर म्हणून काम करत होता.