यवतमाळ : नागपूरकडे जाण्यासांठी ५० प्रवासी बसून असलेली एस.टी. बस एका मद्यधुंद चालकाने चक्क पळवून नेली. ही बाब लक्षात येताच, आगारातील काही चालकांनी बसचा पाठलाग करून काही अंतरावर बसला अडविले. त्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.पांढरकवडा एस.टी. आगारात २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ही धक्कादायक घटना घडली. चौकशीअंती बस पळविणारा आरोपी हा राळेगाव एसटी आगारात चालक असून त्याला तातडीने निलंबीत केले आहे.
पांढरकवडा आगारातील चालक नीळकंठ देवराव घोडाम यांनी एमएच ११ बीटी ९२२९ क्रमांकाची एस.टी. बस फलाटावर लावली होती. वाहक आणि चालक वाहनाची नोंद (प्रोसेस) पूर्ण करण्यासाठी कंट्रोल केबिनकडे गेल्याची संधी साधून एका मद्यपी चालकाने बसमध्ये प्रवेश केला आणि बस फलाटावरून काढून थेट शहराकडे नेण्यास सुरुवात केली.
आपली बस पळवली जात असल्याचे चालक घोडाम यांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने बसच्या दिशेने धाव घेतली आणि त्या व्यक्तीला आवाज दिला. मात्र, मद्यधुंद अवस्थेतील त्या व्यक्तीने काहीही ऐकले नाही. त्यानंतर आगारातील काही सतर्क चालकांनी तातडीने दुसऱ्या वाहनाने या पळवून नेलेल्या बसचा पाठलाग सुरू केला. फिल्मी स्टाईलने झालेल्या या पाठलागानंतर अखेर त्या मद्यपीला शहरातील एका वाईनबारजवळ अडविण्यात आले. त्या मद्यपीचे नाव विनोद अंबादास आत्राम (वय ३८, रा. राळेगाव) असल्याचे उघड झाले. त्याला आगारात आणले. आगार प्रमुखांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरु आहे.