File Photo
यवतमाळ

यवतमाळ : महिलांचे हातपाय बांधून, बंदुकीचा धाक दाखवत भरदिवसा घरफोडी

किराणा व्यावसायिकाचे घर लूटले; आरोपींना अटक

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : अलिशान वाहनाने आलेल्या दरोडेखोरांनी एका किराणा व्यावसायिकाचे घर गाठले. घरात शिरून दोन महिलांच्या तोंडाला पट्टी लावली. एका महिलेवर बंदुक रोखली, दुसऱ्या महिलेच्या गळ्यावर चाकु ठेवला. दोरखंडाने हातपाय बांधून डोळ्यावर पट्टी बांधली. यानंतर घरातून रोख, सोने व चांदी असा लाखों रुपयाचा मुद्देमाल लुटला. ही खळबळजनक घटना दारव्हा शहरातील बारीपुरा परिसरात आज मंगळवारी भरदिवसा दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

गणेश वसंतराव काळबांडे असे किराणा व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे बळीराम पुंजाजी काळबांडे नावाने शहरातील अतिशय जुने किराणा दुकान आहे. बेलोरो वाहनाने आलेले दरोडेखोर हे गणेश बाळबांडे यांच्या घरात शिरले. काही कळायच्या आत घरात असलेल्या दोन महिलांच्या तोंडावर पट्टी बांधली. त्यानंतर एका महिलेवर बंदुक रोखली, दुस-या महिलेच्या गळ्यावर चाकु ठेवला. दोरखंडाने महिलांचे हातपाय बांधुन ठेवले. त्यानंतर घरातून चार लाख रुपये रोख, २५ तोळे सोने, दोन किलो चांदी असा ३० ते ३५ लाख रुपयाचा मुद्देमाल लुटला. चारचाकी वाहनातून दरोडेखोरांनी पोबारा केला. दरम्यान काळबांडे हे दुकानातून घरी जेवन करण्यासाठी घरी परत आल्यावर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेची वार्ता पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांना माहिती मिळताच दारव्हा पोलीसांनी घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी व अन्य पोलीस पथकांनी भेट दिली.

सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपींना केली अटक

दारव्हा येथे दरोडा टाकून पसार झालेल्या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र नांकेबंदी करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेसह अन्य पोलिस पथक विविध ठिकाणी रवाना झाले होते. दरम्यान पोलीस मागावर असल्याची भनक लागल्याने शेंबाळपिंप्री शिवारात दरोडेखोरांनी आपले वाहन उभे केले. त्यानंतर तेथून शेतातून पसार होण्याच्या मार्गावर होते. खंडाळा पोलिसांनी पाच किमी अंतर सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपींना जेरबंद केले. अश्रफ परवेज खान, महेश रामप्रसाद पिंपरणे, आदर्श देवी सिंग बिडला, कार्तीक रमेश डुलकेजा, गणेश शाम कोटूरवार (सर्व रा. नांदेड) अशी आरोपींची नावे आहे. अन्य २ आरोपींची नावे कळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT