यवतमाळ : धरणाच्या समोरील भागात साचलेल्या पाण्यात बुडून एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथे शुक्रवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. साई दिलीप कुमार (वय ५ वर्ष रा. जालना, ह. मु. अरुणावती धरण रेस्ट हाऊस जवळ चिरकुटा) असे बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
साई हा आपल्या मामाच्या घरी आईसोबत चिरकुटा येथे आला होता. मृतकाची आई अरुणावती धरणाच्या साचलेल्या पाण्यातून दुपारी चार वाजताच्या दरम्यान पाणी भरत होती. मृतक मुलगा त्या पाण्यात गेला असता तो बुडाला. आईला आपला मुलगा कुठेही दिसत नसल्याने पाण्यात बुडाला असल्याचा संशय आला. तेव्हा नागरिकांनी पाण्यात शोध घेतला असता आढळून आला नाही. तेव्हा बाजूला असलेल्या पाण्यात मुलगा दिसताच आईने एकच आक्रोश केला. तेव्हा याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह त्यांच्या मूळ गावी जालना येथे अंतिम संस्कार करण्यासाठी रवाना झाला आहे. मृतक बालक हा परिवारात एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई, वडील आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.