यवतमाळ : एका १४ वर्षीय बालिकेने मैत्रिणीसोबत झालेल्या वादाच्या तणावातून गळफास लावून जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील सायखेडा येथे मंगळवार १८ मार्चला घडली. कोमल रमेश रुडे असे मृत बालिकेचे नाव आहे. कोमलचा गावातील एका मैत्रिणीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर मैत्रिणीचे आई-वडील व भाऊ कोमलच्या घरी भांडण्यासाठी गेले.
या घटनेमुळे मनातून तणावग्रस्त झालेल्या कोमलने घरात एकटी असताना गळफास लावून जीवनयात्रा संपविली. घटनेच्या वेळी कोमलचे आई-वडील आणि भाऊ घराबाहेर गेले होते. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. कोमलच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर संबंधित चार जणांविरोधात दारव्हा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोमलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केले. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.