उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धानोरा (सा) येथे 20 जुलै रोजी धुर्यावर बैल चारण्याच्या कारणावरून कुर्हाडीने प्राण घातक हल्ला करून पसार झालेल्या आरोपीचा मृतदेह शुक्रवारी (दि.25) गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील विडुळ शेत शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने तसेच पावसामुळे पांदनरस्ता खराब असल्याने दोन किमी ट्रॅक्टरमधून जात पोलिस कर्मचारी व डा. जयराम बस्सी यांनी व सततच्या पावसामुळे पांदन रस्ता खराब असल्याने दोन किमी ट्रॅक्टर वरून पोलीस कर्मचारी व डॉ जयराम बस्सी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रामा सोनुले (वय 36, रा.धानोरा) यांच्यावर शेतात बैल चारणाच्या वादावरून प्राणघातक हल्ला करून आरोपी कैलास रामा जाधव (वय 45, रा. धानोरा) हा फरार झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर स्थानिक ग्रामस्थांना गावापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर विडूळ शेत शिवारात संतोष विठ्ठलराव नगारे यांच्या शेतात एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती प्रभाकर कानकाटे यांना मिळाली. त्यांनी लगेच विडूळ पोलीस पाटील गजानन मुलंगे यांना ही माहिती दिली. त्यांनी ठाणेदार शंकर पांचाळ यांनी सांगितल्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम बस्सी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. यावेळी सपोनि निलेश सरदार, पोउप. अमर खिल्लारे, दिलीप चव्हाण, गजानन फोले, गजानन गिते, तोषिक काजी, गिरप्पा मुसळे, सुनिल ढोंबरे, विडूळचे पोलीस पाटील गजानन मुलंगे, धानोरा (सा) पोलीस पाटील विठ्ठलराव पाटील, सरपंच प्रकाश जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष बालाजी काळे, डॉ स्वानील जिवणे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय काळे आदी यावेळी उपस्थित होते.
मयताचा मुलगा स्वराज जाधव याने मृत्युदेह हा माझ्या वडीलाचा असल्याचे सांगितले. त्यावरून हा मृतदेह कैलास जाधव याचा असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. कैलास जाधव याचा मृत्यू विषारी औषध प्राशन केल्याने झाल्याचा अंदाज वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम बस्सी यांनी व्यक्त केला आहे.